मृत्यूजय

 *भाग-९७*


*मृत्युंजय*


*शोण*


सत्तावीस

देशोदेशी फिरून मी आणि सत्यसेनानं वधूकन्या पसंत केल्या. दादानं

मीनाक्षीसाठी मथुराराज्यातील वर निवडला. सर्वत्र आमंत्रणं गेली. त्या आमंत्रणांत

नव्या आप्तेष्टांना अधिकांत अधिक अनाथ, अपंगांना घेऊन येण्याची विनंती आग्रहानं

केली गेली होती. राजज्योतिषांनी आणि पुरोहितांनी सांगितलेला शुभदिवस आला!

राजनगरात सर्वत्र फिरून वृषाली आणि सुप्रियावहिनींनी अक्षता वाटून सर्वांना

आमंत्रणं दिली होती. नगराबाहेरच्या विदुरांच्या पर्णकुटीत जायलासुद्धा त्या विसरल्या

नव्हत्या!

पहाटेपासूनच राजवाड्यावर नगारे घुमत होते. आपल्या दिग्विजयी सेनापतीच्या

आणि दानशूर महामानवाच्या पुत्रांच्या विवाहांचा आनंद व्यक्त करण्यासाठी सर्वांनी

आपली निवासं सजविली होती. ही सूतपुत्रांची लग्नं आहेत, असं म्हणण्याचं धाडस

आता एकाही राजानं केलं नसतं! राजवाडा तर एखाद्या नववधूसारखा नटविण्यात आला

होता! आमचे थकलेले मातापिता देहांची कुरकुर विसरून नातवांच्या विवाहांत

उभारलेल्या भव्य मंडपातील बोहल्याभोवतीच्या मंगलकलशांवर श्रीफलं ठेवीत होते.

जीवन वेडावलं होतं. आमच्यावर सौख्याचं मुक्त हस्तानं दान करीत होतं. दिग्विजयातील

सर्व राजे हस्तिनापुरात आले होते. जे येऊ शकले नव्हते त्यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी

अमात्य, महामंत्री, सेनापती कुणी ना कुणीतरी पाठविलं होतं. ते सर्व जण वधू-वरांना

बघण्याऐवजी मंडपाबाहेर ब्राह्मण, ऋषिमुनी, अनाथ, आपद्ग्रस्त यांना दान देत

असलेल्या दानवीर अंगराजाला पाहण्यासाठीच अधिक गर्दी करू लागले.

"महाराज धृतराष्ट्रासारखा मी नगराचा अधिपती असतो तर 'हस्तिनापूर' हे

नाव बदलून मी 'कर्णपूर' हेच नाव ठेवलं असतं त्या नगराचं!” सर्व सोहळा पाहून

भारावलेला विदर्भराज रुक्मी मला हे म्हणाला.

विवाह पार पडले. देशोदेशींचे तृप्त याचक 'जयतु कर्ण, जयतु!' असे आशीर्वाद

देत निघून गेले. त्या रात्री सर्व नगरभर समयांची रोषणाई पाहताना स्वर्ग आकाशात

आहे की धरतीवर याचा मला संभम पडला!

आपल्या सुनांना आशीर्वाद देताना दादानं काढलेले उद्गार माझ्या कानांत

घोटाळत होते.

“राजवाड्यात आलात तरी तुम्ही सारथिकन्या आहात हे कधीच विसरू नका!” हे

ते उद्गार होते. ते आठवताना मला जगाचा विसर पडला. नाही म्हणायला मनाच्या

कोपऱ्यात कुठंतरी दूरवर मात्र पांडवांची स्मृती वळवळत होती! त्यांना वनवासाला

जाऊन दहा वर्षे झाली होती! कुठल्यातरी अरण्यात, एखाद्या जीर्ण पर्णकुटीत अंधाराचं

काळं वस्तर पांघरून ते झोपले असतील! मन अस्वस्थ होतं.

मीनाक्षीला पतिगृही पाठविताना होणारं दु:ख, तिच्यासारख्या सात मीनाक्षी

सुनांच्या रूपात वाड्यावर वावरताहेत हे पाहून मी गिळून टाकलं! याचकांना देऊन रिती

झालेली कोठारं विवाहांतल्या देणग्यांच्या रूपानं पुन्हा भरली होती! गंगेच्या पात्रासारखं

दादाचं दानसत्र अखंड चालूच होतं. एकही याचक विन्मुख परत जात नव्हता. जाणार

नव्हता!

पतिगृही जाताना मीनाक्षीनं अंगराजांसाठी- आपल्या वंदनीय काकांसाठी - एक

संदेश दिला. विवाहाच्या धामधुमीत तो मी त्याला सांगू शकलो नव्हतो. “तुमच्या

कुंडलांशी खेळणाऱ्या नातवांना पाहण्यासाठी मी लवकरच परत येईन!” असा तो संदेश

होता. तो सांगून त्याच्या प्रसन्न मुखावरचं हास्य खुलवावं म्हणून मी त्याच्या

महालाच्या द्वारात उभा राहिलो. पण पण सूर्योदय झाला तरी त्याच्या कक्षाचं द्वार

बंदच होतं! आठ-दहा वेळा ठोठावलं तरी आतून प्रतिसाद काही येईना! शंकेनं मन

झाकाळून गेलं. असं पूर्वी कधीच घडलं नव्हतं!

“दादाऽऽऽद्वार उघड दादा!" मी भयानं कसातरी बोललो.

“कोणऽऽ शोण?" आडदंड दूर झाला. द्वार उघडलं गेलं. सोनेरी केसांच्या कुरळ्या

बटा विखुरल्यामुळे त्याचं सदैव प्रसन्न दिसणारं मुख चिंताग्रस्त दिसत होतं! पाठीवर

हातांची गुंफण बांधून तो एकसारखा कक्षात इकडून तिकडे अशा अवस्थेत फेऱ्या घालू

लागला.

“का काय झालं? तुझं मुख एवढं म्लान का?” मी न राहवून विचारलं.

“काहीऽ काही सुचत नाही शोण!"

"कशाबद्दल बोलतो आहेस तू?"

“स्वप्नाबद्दल! रात्री मी एक अद्भुत स्वप्न पाहिलं आहे."

“कोणतं स्वप्न? अरे, स्वप्नं काही सत्य नसतात!"

"नाही शोण! हे स्वप्न सत्य ठरणार असं माझी मनोदेवताच मला सांगते आहे.

या स्वप्नात साक्षात सूर्यदेवांशी माझं संभाषण झालं आहे!"

"काय, काय झालं संभाषण?"

"ते म्हणाले की, उद्या प्रत्यक्ष इंद्र याचक म्हणून तुझ्या द्वारात येणार आहे!

धन, संपत्ती, वस्त्रं, गायी यांपैकी काहीच न मागता तो मागणार आहे...."

“काय मागणार आहे?"

“कवच आणि कुंडलं, शोणा! कवच आणि कुंडलं! आणि तीही अर्जुनासाठी!!” तो

द्रुतगतीनं अस्वस्थ फेऱ्या घालू लागला.

“नाही दादा! काही झालं तरी हे दान मात्र तू मुळीच देऊ नकोस! हे दान नाही;

दास्य ठरणार आहे!" मी जवळ-जवळ किंचाळलो. माझं शरीर थरथरत होतं!

“हेच मला सूर्यदेवांनीही निक्षून सांगितलं आहे. कवच-कुंडलं दिलीस, तर तुझा

सर्वनाश होईल असं ते पुन:पुन्हा आवर्जुन म्हणाले."

"मग काय उत्तर दिलंस त्यांना तू?"

“शोण, मी दिलेलं उत्तर तुला आवडणार नाही - ऐकवणार नाही."

"सांग! लवकर सांगितलं नाहीस तर माझा श्वास थांबेल!"

"सूर्यदेवांना वंदन करून मी सांगितलं आहे की, प्रत्यक्ष इंद्र याचक म्हणून

माझ्या द्वाराशी येणार असेल, तर अशा याचकाला शोभणारं कवच-कुंडलांचं दानही मी

अवश्य देईन!” त्याचे शब्द तप्त लोहरसासारखे माझ्या कानांत शिरले.

“का? कशासाठी स्वत:च्या प्राणांशी हे महाभयानक द्यूत तुला खेळावंसं वाटतं

आहे?"

“शोण, तुला कधीच कळणार नाही! हे दान केवळ कीर्तीसाठी मी देणार आहे!”

"कीर्ती-कीर्ती! आतापर्यंत काय तुला कमी कीर्ती प्राप्त झाली? 'कीर्ती' म्हणजे

तरी काय? फसवी वारांगना नाही तर काय? कसली कीर्ती पाहिजे आहे तुला आणखी?"

“बल आणि वृत्रासुर यांना ठार मारणाऱ्या, स्वर्गाचा अधिपती असलेल्या,

देवांचाही देव म्हणवून घेणाऱ्या कीर्तिश्रेष्ठ इंद्राचा वरदाता कर्ण अशी कीर्ती मला

संपादन करून घ्यायची आहे! शोण, उद्या प्रत्यक्ष स्वर्ग या पुरातन धरित्रीकडे भिक्षा

मागण्यासाठी येणार आहे! या वैभवासाठी कवच-कुंडलंच काय; पण मी प्रोणही होमून

टाकीन! वीरांच्या जन्म-मृत्यूच्या कल्पना वेगळ्या असतात! कीर्तिहीन मनुष्य हा जिवंत

असला तरी मृतवतच असतो! कीर्तिवंतालाच स्वर्गाची द्वारं मुक्त असतात! कीर्ती ही

माणसाला स्मृतीच्या रूपानं अमर नवजीवन देणारी दुसरी माताच असते! कीर्तिहीन

जीवन हे जीवन्मृताचं जीवन असतं! दिनरात्र भोजन, निद्रा, धन, प्रेम यांसाठी धावणं

म्हणजे जीवन नव्हे! जीवनाची गणती कीर्तीच्या मानदंडानंच होत असते! तसे

महासागरात शेकडो वर्ष जगणारे देवमासे नसतात का? पण कुणीही त्यांना अमर नाही

म्हणत! केवळ जिवंत असणं म्हणजे जगणं नव्हे! कसं जिवंत असावं हे कीर्ती ठरवीत

असते! तसे पृथ्वीच्या या विशाल पाठीवर प्रत्यही हजारो जीव जन्म घेतात आणि मृत्यू

पावतात! त्यांच्यासाठी अश्रू ढाळण्याइतका अवसरही कुणाला नसतो! पण ज्यांच्या

जाण्यानं मनामनांचे कुंभ वियोगाच्या विदारक यातनेनं भंग पावतात तेच खरे कीर्तिमान!

तेच खऱ्या अर्थानं जगले आणि खऱ्या अर्थानं मेले! म्हणूनच जीवन आणि कीर्ती यांपैकी

काय निवडणार आहेस, असं विचारणाऱ्या सूर्यदेवांना मी 'कीर्ती!' असंच उत्तर दिलं आहे!

कीर्ती कलंकित करून मिळणारं जीवन मी कधीही स्वीकारणार नाही!"

“मग असलं हे कीर्ती प्राप्त करून देणारं दान देताना एवढा अस्वस्थ तरी का

झाला आहेस? दादा, जीवनाची आशा ही सर्व आशा-आकांक्षापेक्षा श्रेष्ठ असते हे

नाकारू नकोस! जिवंत असताना कीर्ती मिळाली तर आत्मसन्मानाचं सौख्य तरी मिळेल,

पण मृत्यूनंतर त्या कीर्तीचा उपयोग तरी काय? सुगंधी फुलांची माला प्रेतावर चढवून

तिचा सुवास ते प्रेत काही अनुभवू शकत नाही. जगात अस्तित्वात असणं - कोणत्याही

मार्गानं अस्तित्वात असणं, हाच खरा पराक्रम आहे! तेच खरं जीवन आहे! तुझ्या द्वाराशी

इंद्राला पाठविणाऱ्यांची तरी दुसरी कोणती उदात्त कल्पना आहे? ते केवळ जगू

पाहताहेत! जगणं हा जिवाचा स्थायिभाव आहे म्हणूनच तुझं मन आज कातर झालं आहे!

जगण्यासाठी! कारण तुलाही माहीत आहे की, कवच-कुंडलांमुळे तू युद्धात अवध्य आहेस!

अजिंक्य आहेस! अर्जुनासारखा धनुर्धरसुद्धा तुझा पराभव करू शकणार नाही. दादा,

मनाच्या सत्य स्वरूपाला साथ दे! कवच-कुंडलं दान देऊ नकोस! अर्जुनवधाच्या

प्रतिज्ञेची तरी आठवण ठेव!"

“शोण, फार बोललास! माझ्या सहवासात राहून कधी बोलला नव्हतास तेही

बोललास! सरोवरात फुललेल्या कमलपुष्पांच्या मकरंदाची गोडी सरोवरच्या पाण्यालाही

कळत नसते! ती कळते दूरस्थ भ्रमरांना! तुझीही तीच स्थिती आहे! जीवनभर मी कसा

वागलो, हे तुलाही कळू नये याचं आश्चर्य वाटतं! माझ्या सहवासात राहून, खांद्याला

खांदा लावून जगूनही तू असं म्हणावंस? जिवाच्या भयानं मी कातर आहे, अस्वस्थ झालो

आहे आणि त्यामुळेच मला काही सुचत नाही, असंच तुलाही वाटतं? शोण, मी कातर

झालो आहे, अस्वस्थ झालो आहे, काही सुचेनासं झालं आहे मला - हे सारं खरं आहे; पण

ते का?"

"का?"

तो रहस्याचं जाळं अधिकच गुंफत होता.

“शोण, अंगावरचं हे अभेद्य कवच आणि ही तळपणारी कुंडलं देवराज इंद्रानं

मागितली, तर त्याला ती कशी व कुठून कापून काढून द्यावीत, हे सुचत नाही म्हणून मी

अस्वस्थ आहे!! कसं शस्त्र चालवू मी या अभेद्य शरीरावर? कीर्तीचा समोर आलेला हा

कुंभ कवच-कुंडलांच्या अभेद्यपणामुळे भंगणार की काय? मी अस्वस्थ आहे तो केवळ

यासाठी! रात्रभर विचार करतो आहे; पण अजून मार्ग काही सुचत नाही! सांग शोण,

कसं आणि कुठून कापू शकणार मी हे कवच?” तो पुन्हा पाठीवर हात गुंफून अस्वस्थ-

अस्वस्थ फेऱ्या घेऊ लागला.

मी मान खाली घातली. त्याच्या गगनचुंबी विचारांसमोर खरोखरच मला माझे

विचार अतिशय क्षुद्र वाटले! कितीतरी काल आम्ही तसेच शांत होतो. शेवटी मला

कक्षात सोडून तो अर्घ्यदानास जाण्यासाठी कोरडं उत्तरीय घेऊन निघून गेला.

वृषालीवहिनींसह सर्वांना ती वार्ता सांगून जागृत ठेवण्यासाठी मी राजवास्तूच्या

कक्षाकक्षांतून फिरू लागलो, पण त्याचा कठोर निर्धार सर्वांना पूर्ण माहीत होता. कवच-

कुंडलं-दानाच्या निर्णयापासून त्याला परावृत्त करण्याचं सामर्थ्य आता आम्हापैकी

कुणातही नव्हतं!

संकलन व संकल्पना

अनिल देशपांडे बार्शी

९४२३३३२२३३

Comments

Popular posts from this blog

नारायण सुर्वे