मृत्यूजय
*भाग-९७* *मृत्युंजय* *शोण* सत्तावीस देशोदेशी फिरून मी आणि सत्यसेनानं वधूकन्या पसंत केल्या. दादानं मीनाक्षीसाठी मथुराराज्यातील वर निवडला. सर्वत्र आमंत्रणं गेली. त्या आमंत्रणांत नव्या आप्तेष्टांना अधिकांत अधिक अनाथ, अपंगांना घेऊन येण्याची विनंती आग्रहानं केली गेली होती. राजज्योतिषांनी आणि पुरोहितांनी सांगितलेला शुभदिवस आला! राजनगरात सर्वत्र फिरून वृषाली आणि सुप्रियावहिनींनी अक्षता वाटून सर्वांना आमंत्रणं दिली होती. नगराबाहेरच्या विदुरांच्या पर्णकुटीत जायलासुद्धा त्या विसरल्या नव्हत्या! पहाटेपासूनच राजवाड्यावर नगारे घुमत होते. आपल्या दिग्विजयी सेनापतीच्या आणि दानशूर महामानवाच्या पुत्रांच्या विवाहांचा आनंद व्यक्त करण्यासाठी सर्वांनी आपली निवासं सजविली होती. ही सूतपुत्रांची लग्नं आहेत, असं म्हणण्याचं धाडस आता एकाही राजानं केलं नसतं! राजवाडा तर एखाद्या नववधूसारखा नटविण्यात आला होता! आमचे थकलेले मातापिता देहांची कुरकुर विसरून नातवांच्या विवाहांत उभारलेल्या भव्य मंडपातील बोहल्याभोवतीच्या मंगलकलशांवर श्रीफलं ठेवीत होते. जीवन वेडावलं होतं. आमच्यावर सौख्याचं मुक्त हस्तानं दान करीत होतं. दिग्...